मानव सेवा हीच ईश्वर सेवा: उद्योजक मनोज भाऊ पवार यांचे रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी : अशरफ अली
कन्नड : “मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या विचाराने प्रेरित होत उद्योजक तथा समाजसेवक मनोज भाऊ पवार यांनी पुन्हा एकदा समाजहितासाठी भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन केले. कन्नड शहरातील पिशोर नाका येथील जैन कॉम्प्लेक्समध्ये मनोज भाऊ पवार यांच्या कार्यालयात दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी या शिबिराचा शुभारंभ झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मनोज भाऊ पवार यांच्या मातोश्री पुष्पाबाई केशवराव पवार, ख्यातनाम वक्ते आणि मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांचे खंदे समर्थक प्रदीप दादा साळुंके, सौ. उर्मिलाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये विविध तज्ञ डॉक्टरांनी शेकडो रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते उपचार आणि औषधे विनामूल्य दिली.
उद्घाटनप्रसंगी मनोज भाऊ पवार यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांशी संवाद साधत आपल्या सामाजिक बांधिलकीचे महत्त्व सांगितले. त्यांनी “मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे” असे भावपूर्ण विचार व्यक्त केले. तसेच त्यांनी आपल्या मनोगतातून ही प्रार्थना केली की, “तालुक्यात कुणालाही आजार होऊ नये, सर्वजण सुदृढ रहावेत, आणि मला पुन्हा पुन्हा अशा शिबिरांचे आयोजन करावे लागू नये.” त्यांनी आपल्या निष्काम सेवेला महत्त्व देत समाजातील सर्व घटकांसाठी निरंतर कार्य करत राहण्याची इच्छा व्यक्त केली.
यावेळी ख्यातनाम वक्ते प्रदीप दादा साळुंके यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी मनोज भाऊ पवार यांच्यासोबत मनोज दादा जरांगेंसह काम करत असलेल्या अठरा पगड जातींच्या संघटनांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी मनोज भाऊ पवार यांच्या रोग निदान शिबिराच्या आयोजनासाठी विशेष शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या समाजसेवेसाठी कौतुक व्यक्त केले.
या शिबिरात भाग घेणाऱ्या रुग्णांनी मनोज भाऊ पवार आणि त्यांचे संपूर्ण परिवार यांचे आभार मानले आणि त्यांच्या या सेवाभावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.