लोणार खरेदी-विक्री संस्थेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, संचालिका जायभाये यांचे आमरण उपोषणाचा इशारा
लोणार प्रतिनिधी: फिरदोस खान पठाण
लोणार खरेदी-विक्री सहकारी संस्थेने नियमबाह्यपणे जमिनीच्या विक्रीचे व्यवहार केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या भ्रष्टाचाराच्या विरोधात संस्थेच्या संचालिका तारामतीताई जायभाये यांनी आवाज उठवत 2 ऑक्टोबर 2024 रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
जायभाये यांनी यापूर्वीच शपथपत्राद्वारे सहाय्यक निबंधक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली होती. तथापि, त्यांनी कळवूनही नियमबाह्य व्यवहार थांबले नाहीत. उलट, सहाय्यक निबंधक शितोळे मॅडम यांनी कोणतीही ठोस कारवाई न करता एक वर्ष उलटल्यावरही संस्थेविरुद्ध कोणतेही कठोर पाऊल उचललेले नाही. याप्रकरणी जायभाये यांच्या विरोधात उलटसुलट पत्रं काढून सुनावण्या लावल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
हिरडव येथील जमिनीच्या विक्रीचा प्रकार उजेडात आल्यावर बुलढाणा जिल्हा निबंधक यांनी 25 जून 2024 रोजी 78 (अ) कलमानुसार संस्थेच्या बरखास्तीचे आदेश काढले होते. मात्र, सिंदखेड राजा सहाय्यक निबंधक शितोळे मॅडम यांनी अद्याप फक्त अहवाल मागवून वेळकाढूपणा चालवला आहे, अशी आरोप संचालिका जायभाये यांनी केला आहे.
तारामतीताई जायभाये यांनी सांगितले की, याप्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास त्या आमरण उपोषणास बसणार आहेत.