कन्नड : अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाजाच्या वतीने कन्नड तालुक्याचे सुप्रसिद्ध वैद्यकीय सेवक डॉ. सिकंदर शब्बीर कुरेशी यांना समाजाचा ‘आयकॉन अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा विशेष पुरस्कार त्यांना त्यांच्या दोन दशकांपासून समाजासाठी दिलेल्या अमूल्य आरोग्य सेवेसाठी देण्यात आला आहे.
चाळीसगाव येथे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाउंडेशनच्या कार्यक्रमात हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून साहेब, अखिल महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात अध्यक्ष युसूफ भाई, आणि प्रोग्रेसिव एज्युकेशन फाउंडेशनचे चेअरमन शकील सर उपस्थित होते. डॉ. कुरेशी यांचे वडील हाजी शब्बीर शेठ, तसेच अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाजाचे पदाधिकारी आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा या प्रसंगी उपस्थित होते.
डॉ. सिकंदर शब्बीर कुरेशी यांनी मागील २० वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे आणि या पुरस्कारामुळे कन्नड तालुका आणि समाजाचा गौरव झाला आहे.