लोणारमध्ये पारंपरिक उत्साहात अग्रमहेश नवरात्रोत्सवाची सांगता
लोणार प्रतिनिधी : फिरदोस खान पठाण
लोणार : शहरासह बुलढाणा जिल्ह्यात रविवारी सकाळपासून श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि विधिवत करण्यात आले. नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस संपल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या.
शहरातील विविध मंडळांनी श्री दुर्गा देवीची प्रतिष्ठापना पारंपरिक पद्धतीने केली होती, आणि या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा भक्तिभावाने पार पडली. काही ठिकाणी मात्र, देवीची प्रतिष्ठापना न करता दांडियाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात उत्साही नागरिकांनी भाग घेतला. अग्रवाल आणि माहेश्वरी समाजाने देखील आपल्या पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला, ज्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती.
मूर्ती विसर्जनाच्या दिवशी, मिरवणुकांना मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती. या प्रसंगी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता, ज्यामुळे उत्सव शांततेत पार पडला. नगरपालिकेने देखील मूर्ती विसर्जन स्थळी सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरवल्या होत्या.
शहरात गेल्या नऊ दिवसांपासून नवरात्रोत्सवाचा उत्साह अनुभवायला मिळाला. विविध कार्यक्रम, पूजा आणि मिरवणुका यांच्या माध्यमातून उत्सवाचे माहोल सर्वत्र पाहायला मिळाले. आता देवीच्या विसर्जनानंतर नवरात्रोत्सवाची सांगता झाली, परंतु नागरिकांच्या मनात हा उत्सव पुढच्या वर्षासाठीही नवी ऊर्जा घेऊन आला आहे.