लोणारमध्ये सिरत क्विज आणि ईद मिलादुन्नबी कार्यक्रमाचे आयोजन, जमियते उलमाचे प्रमुख उपस्थित
फिरदोस खान पठाण
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे २२ सप्टेंबर २०२४ रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त डॉक्टर जाकीर हुसेन ज्युनियर कॉलेजमध्ये सिरत क्विज कॉम्पिटिशन होणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थी भाग घेणार असून, सिरत अर्थात मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित प्रश्न विचारले जातील.
या स्पर्धेचे निकाल त्याच दिवशी जाहीर केले जातील आणि विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष बक्षिसे दिली जातील.
या कार्यक्रमानंतर, ईद मिलादुन्नबी निमित्त एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जमियते उलमाए हिंदचे राज्याध्यक्ष हाफीज नदीम सिद्दिकी आणि विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन शाह कासमी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील व राज्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी आणि प्रमुख पाहुणे देखील या सोहळ्यात हजर असतील.
कार्यक्रमाचे आयोजन दुपारी २:०० ते ५:०० वाजेपर्यंत करण्यात आले असून, या कार्यक्रमासाठी जमीयतचे तालुकाध्यक्ष ऍड. मोहम्मद रिजवान जड्डा यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.