पारधी समाजातील बापलेकांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी; 36 तासांनंतर खुरामपूर येथे अंतिम संस्कार
लोणार प्रतिनिधी - फिरदोस खान पठाण
लोणार : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. देऊळगाव कुंडपाळ शिवारातील गायरान परिसरात ओढ्याजवळ पारधी समाजातील एका मुलगा आणि त्याचे वडील संशयास्पद अवस्थेत मृत आढळले. ही घटना 1 ऑक्टोबरच्या सायंकाळी उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेनंतर गावातील आणि मृतकांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मृतकांच्या नातेवाईकांनी खून झाल्याचा संशय व्यक्त करून या प्रकरणात त्वरित कारवाईची मागणी केली. त्यांनी संशयितांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत या प्रकरणात दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यामुळे अखेर मृतकांच्या नातेवाईकांनी मृतदेह घेतले.
मृतदेह 36 तासांहून अधिक काळ ताब्यात असल्यामुळे दिरंगाई झाली होती. अखेर, 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता, खुरामपूर येथे मृतकांचा अंतिम संस्कार करण्यात आला.
घटनेची गंभीरता लक्षात घेता, लोणार पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक गोपाल राठोड, संजय जाधव, बिट जमादार गजानन सानप, विशाल धोंडगे, गणेश लोढे, नितीन खर्डे, अनिल शिंदे, तसेच मंडळ अधिकारी लक्ष्मणराव सानप हे देखील या प्रकरणाच्या तपासात सहभागी आहेत.
संपूर्ण गावात या घटनेनंतर तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, तपास चालू असून या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.