लोणार तालुक्याला विधानसभेची उमेदवारी मिळावी, उमेदवारी मिळाल्यास परिवर्तन शक्य – प्रा. मो. लुकमान कुरैशी यांची मागणी
प्रतिनिधी : फिरदोस खान पठाण
लोणार : गेली ३० वर्षांपासून लोणार-मेहकर विधानसभा मतदारसंघातील आमदार नेहमीच मेहकर तालुक्यातूनच निवडून आले आहेत. लोणार तालुक्याला मात्र नेहमीच उपेक्षेची वागणूक मिळालेली आहे. महेकरमधील आमदारांनी लोणारच्या विकासासाठी पुरेशी मदत केलेली नाही. त्यामुळे लोणार तालुक्यातील जनतेमध्ये नाराजी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रा. मो. लुकमान कुरैशी यांनी यावेळी मागणी केली आहे की, यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत लोणार तालुक्यालाच उमेदवारी मिळावी. त्यांचे म्हणणे आहे की, लोणार तालुक्यातील लोकांना स्थानिक उमेदवारच हवा आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मेहकरमधील उमेदवारांनी लोणारचा अपेक्षित विकास केलेला नाही. त्यामुळे लोणारमधील पाणी, रस्ते, विजेच्या समस्या आणि घाणीचे प्रश्न अद्याप कायम आहेत.
प्रा. कुरैशी यांनी पुढे असेही सांगितले की, यावेळी जनता पक्षाच्या आधारावर नाही, तर उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्व आणि कामगिरीच्या आधारावर मतदान करेल. लोणारमधून उमेदवारी दिल्यास साहेबराव पाटोळे, डॉ. गोपाल बच्छिरे किंवा प्रा. सतीश ताजने हे सक्षम उमेदवार ठरतील.
या तिघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी, लोणारचा उमेदवार विधानसभा निवडणुकीत नक्कीच यशस्वी होईल.